शंकऱ्याच्या गुरुजींची गोष्ट

प्रसाद शिरगांवकर

'आपला नंबर कदी लागनार बा?' छोट्या चंद्यानं त्याच्या बापाचा, शंकऱ्याचा सदरा ओढत त्याला विचारलं.

'गप उबा ऱ्हा की, येवढी गर्दी दिसत नाय का तुला', शंकऱ्या त्याचा हात झटकत त्याच्यावर डाफरला. मनातल्या मनात आज चंद्याला का घेऊन आलो याचा विचार करत स्वतःवरच चिडला.

आश्रमात आज तुडुंब गर्दी होती. गुरुजींच्या दर्शनासाठी प्रचंड मोठी लाईन लागली होती. दोन तास शंकऱ्या आणि चंद्या लाईनमध्ये उभे होते. आत्ताशी ते आश्रमाच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पोचले होते. शंकऱ्यानं आत डोकावून बघितलं तर आश्रमाचा मुख्य हॉलही गर्दीनं तुडुंब भरला होता. हॉलच्या दुसऱ्या टोकाला गुरुजी बसले होते. त्यांच्या नेहमीच्या आसनावर. बाजूला सतीश सर बसले होते. सतीश सर म्हणजे गुरुजींचे पट्टशिष्य. मंडईतल्या भाजीविक्रेत्यांसाठी काहीतरी कार्यशाळा वगैरे घ्यायचे. त्यातच शंकऱ्या गेला होता एकदा. आणि मग सतत आश्रमात जायला लागला होता.

'बा, लै कटाळा आलाय आन भूक लागलिया. चल ना घरी जाऊ' चंद्या म्हणाला. शंकऱ्यानं त्याच्याकडे वैतागून बघितलं. 'तुला गुर्जींच्या पाया पडाया आनलंय आन तुला कटाळा आलाय का रं फुकन्या. गपबस.' चंद्या रडवेला झाला आणि म्हणाला 'पन, खरंच भूक लागलिया. मं मी काय करू'

शंकऱ्यानं खांद्याला अडकवलेली पिशवी उघडून बघितली. गुरुजींना देण्यासाठी स्वतःच्याच हातगाडीवरचा २१ केळ्यांचा सुंदर घड त्यानी आणला होता. त्यातलं एखाद दुसरं केळं तोडून चंद्याला द्यायचं त्याच्या जिवावर आलं. त्या घडाच्या शेजारी त्याला बिस्किटचा एक छोटा पुडा दिसला. त्याच्या बायकोनं ठेवला असावा बहुदा. पण त्याक्षणी त्याला तो गुरुजींनी केलेला चमत्कार वाटला. त्यानं तो पुडा काढून चंद्याच्या हातात दिला. 'ह्ये घे, बिस्किट खा. अन आता गुमान उभा ऱ्हा'. चंद्या आनंदानं पुडा उघडून बिस्किटं खायला लागला.

हॉलमधल्या गर्दीतून वाट काढत काढत गुरुजींपर्यंत पोचायला त्यांना अजून एक तास लागला. शंकऱ्यानं चंद्याला उचललं आणि गुरुजींच्या पायावर त्याचं डोकं टेकवलं. पिशवीतून केळ्यांचा घड काढून गुरुजींच्या पायापाशी ठेवला.

'हा आपला शंकर बरं का गुरुजी. मंडईबाहेर केळ्यांची गाडी असते त्याची. आणि हा त्याचा हुषार मुलगा' सतीश सरांनी गुरुजींना शंकऱ्या-चंद्याची ओळख करून दिली. गुरुजी प्रसन्नपणे हसले. शेजारी पडलेल्या फळांच्या ढिगातून एक सफरचंद उचलून चंद्याच्या हातात दिलं. 'खूप मोठा होईल. कलेक्टर होईल तुझा मुलगा.' असा शंकऱ्या-चंद्याला आशीर्वाद दिला. तितक्यात, 'चला चला, पुढे व्हा पुढे व्हा' च्या रेट्यात शंकऱ्या-चंद्या गुरुजींसमोरून पुढे ढकलले गेले.

हातात मिळालेलं सफरचंद बघून चंद्या खूप खुष झाला होता. 'बा, खाऊ का मी?'. 'खा. पन थोडं मला आन तुझ्या आवशीला पन ठ्येव. गुर्जींचा प्रसाद हाय त्यो'. शंकऱ्या म्हणाला. अन मग गर्दीतून चंद्याला ओढत ओढत आश्रमाबाहेर पडला.

*****

"पुढच्या वर्षी मांडव घालावा लागेल आश्रमाबाहेर. खूप भक्त भिजले आज पावसात" उत्सवाची आवरा-आवर सुरु असताना गुरुजी सतीशला म्हणाले.

"घालुया गुरुजी, पण त्यासाठी केळी आणि सफरचंदांची दक्षिणा देणारे भक्त, कॅश दक्षिणा कसे देतील याचा काहीतरी विचार केला पाहिजे", दक्षिणापेटीत जमलेल्या नोटांना रबरबॅंड लावत लावत सतीश म्हणाला.

*****

हातातल्या सफरचंदानं चंद्या आणि त्याला गुर्जींनी दिलेल्या आशीर्वादानं शंकऱ्या अफाट खुष आहेत.

यंदाच्या गुरुपौर्णिमेला कॅशपेक्षा फळं-फुलंच जास्त जमली म्हणून सतीश अफाट वैतागलेला आहे.

"भगवंताची कृपा" म्हणत गुरुजी आपल्या खोलीत निघून गेलेत. त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे भगवंताला तरी माहित आहे का याचा विचार करत सतीश आश्रमाच्या रिकाम्या हॉलमध्ये बसून राहिला आहे.

Average: 10 (2 votes)