आरशात चंद्रही दिसायचा कधी...

प्रसाद शिरगांवकर

आरशात चंद्रही दिसायचा कधी...
अंतरात सूर्यही जळायचा कधी...

राहुनी सुखांत शोधतो सुखे अम्ही
वारुळात वाल्मिकी रहायचा कधी...

छेडतोय आज खिन्न ग्रीष्म गीत मी
जीवनी वसंत गुणगुणायचा कधी

त्याच वारुणीतली सरे अता नशा
स्पर्शताच देह मोहरायचा कधी...

वेळ कापुरापरी उडून चालला
'हाल' मी तुझा तुला पुसायचा कधी?

वेगळीच सप्तके मनांत आपल्या
सूर आपला सखे जुळायचा कधी?

मांडतो हिशेब पाहुनी सरी अता
पावसात जीव हा भिजायचा कधी...

मांडलीक मी तुझाच जीवना अता
सांग तूच कर तुझा भरायचा कधी?

नाचती सभोवती कितीक काफिये
सोबती रदीफही असायचा कधी!

हो प्रकाशमान तू जमेल तेवढा
श्वास मंद तेवतो... विझायचा कधी...

Average: 6.6 (9 votes)