हल्ली आम्ही साठवून ठेवतो

प्रसाद शिरगांवकर

हल्ली आम्ही साठवून ठेवतो
सगळेच अनुभण्यासारखे क्षण
आमच्या मोबाईल मध्ये
पुन्हा कधीतरी निवांत अनुभवण्यासाठी....

नुकत्याच जन्मलेल्या तान्हुल्याचं
गोंडस गोजिरं रूप
साठवून ठेवत नाही आम्ही आमच्या
डोळ्यांत, हृदयात, कणाकणात
पटकन हात जातो खिशाकडे
आणि काढून आमचा मोबाईल
टिपतो त्याची रूपं, वेगवेगळ्या अॅंगलनी
पुन्हा कधीतरी निवांत अनुभवण्यासाठी....

रोजच्या कटकटीला वैतागून
जातो आम्ही दूर कुठेशा समुद्र किनारी
आणि बायकोसोबत निवांत गप्पा मारत
चालत असताना त्या मउशार वाळूवरून
अचानक समोर दिसतो
तांबूस पिवळा भला मोठा मावळतीचा सूर्य
पटकन हात जातो खिशाकडे
आणि काढून आमचा मोबाईल
टिपतो त्याची रूपं वेगवेळ्या सेटींग्जमधे
पुन्हा कधीतरी निवांत अनुभवण्यासाठी....

मित्र खूप दिवसांनी भेटले... मोबाईल... फोटो
मुलानं पहिलं पाऊल टाकलं... मोबाईल... फोटो
आजोबा नातवाला गोष्ट सांगतायत... मोबाईल... फोटो
बायको आज छान दिसतीये... मोबाईल... फोटो
टेरेसमधे मोगऱ्याला बहर आला... मोबाईल... फोटो
कोणताही प्रसंग, कितीही संुदर क्षण आला तरी
पटकन हात जातो खिशाकडे
आणि गोठवून ठेवतो तो क्षण
पुन्हा कधीतरी निवांत अनुभवण्यासाठी....

हे पुन्हा कधीतरीचं निवांत अनुभवणं
पुन्हा कधीच येत नाही
आणि येणारही नाही कदाचित
डोळे मिटायचा क्षण येई पर्यंत
तो क्षण येईल, शेवट समोर स्पष्ट दिसत असेल
तेंव्हाही पटकन हात जाईल खिशाकडे
टिपण्यासाठी तो क्षण
पुन्हा कधीतरी निवांत अनुभवण्यासाठी....

पुन्हा कधीतरी..... ??

Average: 8.5 (4 votes)