हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...

प्रसाद शिरगांवकर

हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...
गिळून हाय भाकरी, पिझाच वावरेल

बनेल जीन्स हाच राष्ट्र-वेष आपुला
गुढीस वस्त्रही नवीन जीन्सचे असेल!

उपास सोडण्यास लोक कापतील केक
प्रसाद वाटताच चॉकलेटही मिळेल

सबंध देश गुणगुणेल रॉक, पॉप, जॅझ
अभंग आपला खुळा हवेमधे विरेल

तहान भागते कुठे पन्हे बिन्हे पिऊन
घशाघशास कोकनेच त्ृप्तता मिळेल

स्वतंत्र भारतातले बघुन हे गुलाम
मनातल्या मनामधे अमेरिका हसेल!

Average: 8.1 (105 votes)