कोण म्हणतं आमच्या घरात

प्रसाद शिरगांवकर

कोण म्हणतं आमच्या घरात
माझं काही चालत नाही?
गरम पाणी मिळाल्याशिवाय
मी भांड्यांना हात लावत नाही!

तसे घरातले सगळेच निर्णय
बायको माझ्यावरच सोपवते
धुणं केंव्हा, भांडी केंव्हा
माझं मला ठरवू देते!

मीही माझ्या स्वातंत्र्याचा
पुरेपुर फायदा घेतो
आधी स्वैपाक करून घेतो
धुणं भांडी मागून करतो...

रहाता राहिली केर-फरशी
आणि आवरा आवर
तेही पटापट करून टाकतो
बाकीची कामं झाल्यावर...

आता विचाराल 'तुमची बायको
घरात काहीच काम करत नाही?'
अहो, असं काय करता
ती माझ्यापासून स्वतःला वेगळं असं धरत नाही!

तिनं केलं काय, मी केलं काय
सगळं एकच असतं
दोघांत भेद करायला जातं
तिथेच जग फसतं!!

प्रसाद...

(कॉपी-पेस्ट व्यावसायिकांना विनंती... ही कविता स्वतःच्या कष्टानी ईमेलद्वारे इतरांना पाठवण्यास माझी काहीही हरकत नाही... मात्र असं करताना मूळ कवीचं (म्हणजे माझं) नाव या कवितेचा कवी म्हणून दिल्यास मी आपला आजन्म उपकृत राहीन!)

Average: 9 (957 votes)