लोखंडाचे टक्कल!

प्रसाद शिरगांवकर

शिरस्त्राण (हेल्मेट) सक्तीनं ग्रासलेल्या समस्त पुणेकरांना सादर सविनय समर्पण!

सुपीक कोणा डोक्यामधली
सुपीकशी ही शक्कल
हरेक माथ्यावरती चढले
लोखंडाचे टक्कल!

(या आधी काय होतं!)
भुरभुरणारे केस कुणाचे
सळसळणाऱ्या लांब बटा
कभिन्न काळे केस कुणाचे
कुणा मस्तकी रंग छटा
(आता काय झालं)
दिसे न काही अता यातले
हरेक डोके असे झाकले!
हरेक डोके अता वाटते
एक-दुज्याची नक्कल!!
हरेक माथ्यावरती चढले
लोखंडाचे टक्कल!

अता जाणवे इतकी माझ्या
सभोवताली डोकी
सावरणारी, वावरणारी
लखलखणारी डोकी
पाहुन डोकी मला समजले
अंतीम सारे सत्य उमजले
'प्रत्येकाला असते डोके'
(असो वा नसो अक्कल!)
हरेक माथ्यावरती चढले
लोखंडाचे टक्कल!

- प्रसाद शिरगांवकर

(कॉपी-पेस्ट व्यावसायिकांना विनंती... ही कविता स्वतःच्या कष्टानी ईमेलद्वारे इतरांना पाठवण्यास माझी काहीही हरकत नाही... मात्र असं करताना मूळ कवीचं (म्हणजे माझं) नाव या कवितेचा कवी म्हणून दिल्यास मी आपला आजन्म उपकृत राहीन!)

Average: 8.4 (11 votes)