मी अण्णांचा ढापुन फोन!

प्रसाद शिरगांवकर

मूळ गीत: मी पप्पांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन!
मूळ कवी: संदीप खरे
(http://www.youtube.com/watch?v=mGfBJmnw3_8)

मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन!
हॅलो, हॅलो, बोलतंय कोण
हॅलो, हॅलो, बोलतंय कोण
हॅलो, बोलतंय कोण…

सोनियाबाई मी गांधींघरची
रिमोट माझा, माझी खुर्ची
वरतुन ऑर्डर माझिच हाय
तुमचे कायबी चालणार नाय
तुम्ही कोण, काय तुमचे नाव
सांगा पटपट कुठले गाव

कसले नाव, नी कसला गाव
रॉंग नंबर लागला राव
मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन!

आमचे नाव राजा शेठ
स्पेक्ट्रम विकतो आम्ही थेट
आमची पोळी, तुमचं तूप
चापुन खातो आम्ही खूप
तुम्ही कोण, काय तुमचे नाव
सांगा पटपट कुठले गाव

कसले नाव, नी कसला गाव
रॉंग नंबर लागला राव…
मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन!

मी तर आहे अट्टल चोर
स्पर्धांमधले ढापतो क्रोअर (crore)
झालो तुरुंगात पसार
तरी समर्थक मला हजार
तुम्ही कोण, काय तुमचे नाव
सांगा पटपट कुठले गाव

कसले नाव, नी कसला गाव
रॉंग नंबर लागला राव…
मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन!

ढगांमधुन बोलतोय बाप्पा
चल थोड्या मारू गप्पा

बाप्पा बोलतोयस तर मग थांब
सगळ्यात आधी एवढं सांग
कालच सांगत होता पप्पु
तिकडेच गेलेत आमचे बापु
एकतर त्यांना धाडुन दे
नाहितर फोन जोडुन दे
तुला सांगतो अगदी स्पष्ट
अर्धिच राहिलिये आमची गोष्ट
म्हणले भारत होईल थोर
राहिले येथे केवळ चोर

डिटेल तुला पत्ता सांगू?
तिथेच पाठव आमचे बापू

बाप्पा, बाप्पा बोला राव
सांगतो, माझं नाव न गाव….

कसले नाव, नी कसला गाव
रॉंग नंबर लागला राव…
मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन!

Average: 8.3 (139 votes)