मी असा आभाळवेडा

प्रसाद शिरगांवकर

मी असा आभाळवेडा पंख मी फैलावतो
तोडुनी बेड्या जगाच्या उंच मी झेपावतो

मानली नाही कधीही कोणतीही बंधने
ना कुणाही वादळाने मी कधी थंडावतो

धाव माझी पाहुनीया सुन्नशा होती दिशा
मी दिशा भांबावलेल्या नेहमी ओलांडतो

कोणतेही गीत माझे ना कुणासाठी कधी
अंतरीच्या पावसाचे सूर मी झंकारतो

राहुनी विश्वातही या विश्व हे माझे नव्हे
पाहिजे जे जे मला ते सत्य मी साकारतो

या अशा आकाशगंगा, ती तशी तारांगणे
भावते माझ्या मनाला, चित्र ते रेखाटतो

निर्मिले हे विश्व ज्याने, सोडले त्याने तरी
मीच वेडा फाटलेली छप्परे शाकारतो!

Average: 7.8 (6 votes)