पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले

प्रसाद शिरगांवकर

डोळ्यात चार थेंबांचे
आभाळ तरारुन गेले
पाऊस फिरकला नाही,
नुसतेच ढगाळून गेले

दाटून आले तेंव्हा मी
रोवून पाय बसलोही
देहात जरा रुजण्याचे
आभास थरारुन गेले

गोंगाट कुठे मेघांचे,
थैमान कुठे वाऱ्याचे
अन जरा थरकता वीज,
अस्तित्व लकाकून गेले

येईल अता वेगाने,
भिजवेल मला प्रेमाने
गात्रांत नव्या स्वप्नांचे
आभाळ फुलारुन गेले

मज किती वाटले तरिही,
मी किती थांबलो तरीही
पाऊस फिरकला नाही...
नुसतेच ढगाळून गेले...

Average: 8.3 (102 votes)