पंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो

प्रसाद शिरगांवकर

पंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो
वेगवेगळ्या वाहिन्यांमधून भळभळणाऱ्या
बाजारू देशभक्तिपटांचा
आणि
चौकाचौकात निमूटपणे उभ्या असलेल्या
तिरंग्यांना
कर्कश्श गाणी ऐकवणाऱ्या
उन्मत्त ध्वनिवर्धकांचा...

पंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो
सिग्नलला उभ्या असलेल्या गाड्यांना
चढाओढीनं कागदी तिरंगे विकणाऱ्या
भविष्यहीन कोवळ्या मळकट हातांचा
आणि
एकेकाळी आयुष्य झोकून देऊन केलेल्या
संग्रामाच्या आठवणींना दूर सारून
आयुष्यावर पसरलेल्या उद्विग्नतेनी
थरथरणाऱ्या कापऱ्या वयोवृध्द हातांचा...

पंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो
सरकारनं 'जन्ते'वर लादलेल्या ड्राय डे चा
आणि या ड्राय डे ला झुगारून
नशोन्मत्त वर्षासहलींमधे चिंब भिजून
ओसंडून वहाणाऱ्या
दिशाहीन बेहोष तरूणाईचा...

अर्थात...
पंधरा ऑगस्ट हा असाही एक उत्सव असतो
एक अब्जापैकी मुठभर हृदयांमधे
सदोदित धडधडणाऱ्या 'जन गण मन' चा
आणि स्वच्छ धुतल्या गणवेशावर
तिरंगी बिल्ला लावून
उत्साहादरानं बागडत शाळेत जाऊन
मनोभावे 'भारत माता की जय' म्हणणाऱ्या
कोवळ्या निरागस शैशवाचा...

याच मुठभर हृदयांमुळे
आणि याच ऊर्जामय शैशवामुळे
हा उत्सव आपण 'स्वातंत्र्यात' साजरा करत राहू शकू
हीच आशा...

Average: 8.7 (144 votes)