साधी धूळ नाही

प्रसाद शिरगांवकर

माझिया भाग्यात साधी धूळ नाही
हाय, या मातीत माझे मूळ नाही

या पुढे जाईन कोठे काय पत्ता
आगगाडीला जिवाच्या रूळ नाही

नाच तू पुंगी जशी वाजेल तैसा
नागराजा हे तुझे वारूळ नाही

नेहमी चौकोन त्यांचे गोल होते
मी गुण्याने आखुनी वर्तूळ नाही!

का कळेना मी इथे धावून आलो
(तारकांना धावण्याचे खूळ नाही!)

अंगणी येतात का काटेच माझ्या
मोगरा मी लावला, बाभूळ नाही

पेरला होता शिवारी प्राण आम्ही
आमच्या पानात का तांदूळ नाही?

Average: 8 (8 votes)