शाळा बदलावी का पोराची?

प्रसाद शिरगांवकर

सोमवारी सकाळी जागच येत नाही
गजर दहादा वाजूनही....
मग उशीर होतो मुलाला उठवायला
मग आरडा अोरडा करत त्याच्यावर
आवरायला लावतो झोपाळलेल्या त्याला,
केवळ दहा बारा मिनिटातच

दप्तर, डबा, वॉटरबॅग चढवून त्याच्या अंगावर
ढकलतो त्याला घराबाहेर,
वेळेशी स्पर्धा करत...
तरीही चुकते त्याची स्कूलबस

मग तसाच कोंबून त्याला गाडीत
सुसाट सुटतो शाळेच्या दिशेनं
'शाळा भरायच्या आत पोचायलाच हवं
चुकवून कशी चालेल शाळा'
असं मोठ्या मोठ्यानं म्हणत

तोडतो दोन-चार सिग्नल
घुसतो एखाद्या नो एंट्रूीत
आणि आईबहिणीवरून शिव्या देतो
उगाच मधेमधे घुसणाऱ्या वहानांना

घंटा वाजून, 'जन गण मन' सुरु व्हायच्या सुमारास
कसे बसे पोचतो आम्ही शाळेत
शाळेचं दार बंदच व्हायला लागलं असतं
मग जीव तोडून धावत जातो
आणि पोराला शाळेत ढकलतो
ढकलता ढकलता शाळेच्या वॉचमनशी हुज्जत घालतो
'एेसा कैसा गेट बंद करताय तुम
अभी एक मिनिट बाकी है टाईम को'... असं काहिसं

कालांतरानं कधीतरी
शाळेतून मुलाचा प्रोग्रेस रिपोर्ट येतो
गणित शास्त्र भाषा वगैरेला बरे ग्रेडस असतात
एकच शेरा असतो
'मुलगा नियम आणि शिस्त पाळत नाही
आणि अधुन मधुन वाईट भाषा वापरतो'

मग आपण सोमवार सकाळचा
गजर लावता लावता विचार करतो
'आपला पोरगा आणि बेशिस्त?
आपला पोरगा आणि वाईट भाषा?'

'ह्या, कंपनीच वाईट आहे या शाळेत
आणि हे सगळं होई पर्यंत शिक्षक काय करतात?
शाळा बदलावी का पोराची?'

Average: 7.3 (3 votes)