सारे तुझेच होते

प्रसाद शिरगांवकर

माझे म्हणू जयाला, सारे तुझेच होते
तारे तुझेच होते... वारे तुझेच होते!

जे वाहतो तयाला ओझे कसे म्हणू मी
पाठीवरी फुलांचे भारे तुझेच होते

तू सांगतेस आता, होता असा उकाडा
उष्मा बतावणारे पारे तुझेच होते

माझ्या तृषार्ततेची गाऊ नकोस गीते
या सागरात पाणी खारे तुझेच होते

का धापतोस आता, का श्वासही फुलावा
डोईवरी सुखांचे हारे तुझेच होते...

Average: 8.3 (14 votes)