सगळ्या प्रेमकथांची अखेर...

प्रसाद शिरगांवकर

सगळ्या प्रेमकथांची सुरुवात
गोड बोलण्यानंच होते
सगळ्या प्रेमकथांची अखेर
मटार सोलण्यानंच होते!

प्रेमात दोघं असतात तेंव्हा
सगळं गुलाबी वाटत असतं
एकमेकांना प्रेमानं दिलेलं
पाणीही शराबी वाटत असतं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!

प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा
'हात' एकमेकांसाठी धरले असतात
दोघंजणं एकमेकांसाठी
राजा-राणी बनले असतात
प्रेमकथांची सुरुवात अशीच
एकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
एकमेकांना झब्बू देण्यानं होते!

प्रेमामधे एकमेकांबद्दल
जे जे काही कळलं असतं
संसारात त्याच गोष्टींवरून
एकमेकांना छळलं जातं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
कळूनही न कळण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
छळून छळून छळण्यानं होते!

एकमेकांच्या वागण्यामधे
आपल्याला फक्त चुका दिसतात
एकमेकांच्या शब्दांमधे
चाबूक आणि बंदुका दिसतात
जे जे होणार नाही वाटतं
ते ते सारं घडत जातं
प्रेमकथेच्या शेवटी शेवटी
सारं सारं बिघडत जातं!

(हे असलं तरी आपण काय करुया)

असंच जरी होत असलं
असं आता होणार नाही
तुझ्या माझ्या कथेला राणी
शेवट अता असणार नाही

तुझ्या माझ्या श्वासांमधे
रोज मोगरा गंध भरेल
मावळणाऱ्या दिवसासोबत
हृदयामध्ये चंद्र उरेल

रोजचा सूर्य आपल्यासाठी
नवी कथा घेऊन येईल
तुझी माझी प्रेमकथा
रोज नव्यानं सुरू होईल
तुझी माझी प्रेमकथा
रोज नव्यानं सुरू होईल

- प्रसाद शिरगांवकर

'मटारा'ची प्रेरणाः दै. सकाळ मधील ब्रिटिश नंदी यांचा एक जुना लेख

कॉपी-पेस्ट व्यावसायिकांना विनंती... ही कविता स्वतःच्या कष्टानी ईमेलद्वारे इतरांना पाठवण्यास माझी काहीही हरकत नाही... मात्र असं करताना मूळ कवीचं नाव (म्हणजे माझं) आणि प्रेरणास्रोत (म्हणजे ब्रिटिश नंदी यांचा उल्लेख) दिल्यास मी आपला आजन्म उपकृत राहीन!

Average: 8.1 (82 votes)