सुचायचे ते सुचून झाले

प्रसाद शिरगांवकर

सुचायचे ते सुचून झाले
लिहायचे ते लिहून झाले

अता खुलासे कशास देता
करायचे ते करून झाले!

रचा सुखाने चिताच माझी
ऋतू सुखाचे बघून झाले

उरात माझ्या अता विरागी
उधाणवेडे जगून झाले

किती करावे असेच फेरे
जगून झाले... मरून झाले...

वसंत येतो अता अताशा
कधीच माझे फुलून झाले!

सखे अहे मी अजून प्यासा
तुझ्या नभाचे झरून झाले

गुन्ह्यात याही कुणी न दोषी
(तपास सारे कसून झाले!)

उदास का तू? तुझे सुखांशी
करारनामे करून झाले

असेल आता जगात शांती
भल्या विळ्यांचे चिरून झाले

कसे सुटावे गणीत साधे?
अनंत बाकी उरून झाले!

Average: 7.3 (8 votes)