श्वासही आहे इथे...

प्रसाद शिरगांवकर

कालही होतो इथे मी आजही आहे इथे
ध्येयही येथेच आहे वाटही आहे इथे

का धरू मी पालवीची आस माझ्या अंतरी
कालचे ते वाळलेले पानही आहे इथे

थोडक्या या चांदण्याने ये अता झिंगू जरा
चांदणी आहे इथे नी चंद्रही आहे इथे

बोलली मी अक्षरे ती धूळ सारी जाहली
लोपल्या धूळाक्षरांची धूळही आहे इथे

काय देवू मी पुरावा लाडके आता तुला
प्रेमरंगी रंगलेला श्वासही आहे इथे

No votes yet