तिचे नि माझे नाते अभंग होते!

प्रसाद शिरगांवकर

भांडण तंटे हे तर तरंग होते
तिचे नि माझे नाते अभंग होते!

एक दुज्यांची काटछाट करताना
शब्दशाप हे हळवे पतंग होते

प्रीत अंतरी उकळत होती तेंव्हा
रागाचे वरवरचे तवंग होते!

कधी वाटले खोल गूढ हे नाते
कधी वाटले सारे सवंग होते...

साखर नुसती? जरा फोडणी द्यावी!
त्याचमुळे हे जगणे खमंग होते!!

Average: 7.8 (42 votes)