गूढचलनातल्या व्यवहारांची नोंद कशी होते?

प्रसाद शिरगांवकर

आपण चेकने किंवा डेबिट कार्डाने व्यवहार करतो तेंव्हा तो ‘बॅंक’ या व्यवहार करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना मान्य असलेल्या मध्यवर्ती संस्थेद्वारे करतो. चेक देणाऱ्याच्या अकाउंटचं बँकेमध्ये रेकॉर्ड असतं. त्यात पैसे आहेत का हे तपासून चेक त्यातून पैसे वजा करून चेक घेणाऱ्या माणसाच्या अकाउंटला जमा करण्याचं काम बँक करते. दोन्ही खाती एकाच बँकेत आहेत असं गृहित धरलं, तर या दोन व्यक्तींमधल्या व्यवहाराची नोंद एकाच बँकेच्या लेजर मध्ये होते.

गूढचलनांना अशी कोणती मध्यवर्ती संस्था नसते. इथे घडणाऱ्या व्यवहारांच्या लेजरच्या नेटवर्कवर अगणित प्रती असतात. नेटवर्कवरच्या कोणाहीकडे लेजरची प्रत असू शकते. आणि सर्व प्रतींमधल्या व्यवहारांची माहिती तंतोतंत सारखीच असते, किंबहुना ती एकसारखीच असावी, कोणताही व्यवहाराची माहिती कोणालाही बदलता येऊ नये ह्या गुणधर्मावरच संपूर्ण गूढचलनाची व्यवस्था उभी राहिली आहे.

एक अगदी सोपं उदाहरण बघा. समजा दहा एकमेकांवर माणसांचा एक गट आहे. हे सारे एकमेकांमध्येच व्यवहार करतात. गटात कोणताही व्यवहार झाला की व्यवहार करणारे आख्या गटाला तो सांगतात. आणि गटातला प्रत्येकजण त्या व्यवहाराची आपापल्या वहीत नोंद करून ठेवतो. ही नोंद “अमुकने तमुकला इतक्या तारखेला इतके पैसे दिले” अशी साधी असते. मात्र कोणीही परस्पर आपल्याकडच्या नोंदीमध्ये फेरफार करू नये म्हणून या नोंदीसोबत एक संकेताक्षरही नोंदवून ठेवतात. गटातला कोणीतरी व्यवहार करणाऱ्या दोघांना ‘ओके तुमचा व्यवहार नोंदवला’ असं सांगतो आणि मगच तो व्यवहार पूर्ण झाला असं मानलं जातं.

ह्या उदाहरणातल्या दहा जणांना लाखांनी गुणलं आणि नोंद ठेवायच्या प्रत्येकाच्या वही ऐवजी त्यांच्या संगणकावरची एक प्रणाली आहे असं मानलं तर जे होईल ती संपूर्ण गूढचलनाची व्यवस्था आहे. एकमेकांना जोडलेल्या संगणकांच्या नेटवर्कवर हे सगळं घडत असल्याने अमुकला तमुकशी व्यवहार करायचा आहे हे क्षणार्धात नेटवर्कवरच्या जगभर पसरलेल्या सर्व संगणकांना कळवलं जातं, तो व्यवहार ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार घडत आहे ना हे आपोआप तपासलं जातं. तो सर्व संगणकांच्या लेजरमध्ये नोंदवला जातो. आणि सगळीकडे तसाच नोंदवला गेला आहे ना हे तपासलं जातं.

(थोडी तांत्रिक माहिती: या व्यवहारांच्या ठराविक नोंदींचा एक गट असतो, त्याला ब्लॉक म्हणतात. एक ब्लॉक दुसऱ्या ब्लॉकला जोडण्यासाठी जे संकेताक्षर वापरतात त्याला हॅश म्हणतात. आणि असे ब्लॉक्स जोडून जोडून एक मोठी साखळी तयार होते त्याला ब्लॉकचेन. मगाशी ‘किचकट गणिती कोडं सोडवणं असं जे म्हणलं ते म्हणजे हे संकेताक्षरांचे ‘हॅश’ शोधून काढणे. हे करण्याचं काम मायनर्स करतात. आणि हे काम केल्या बद्दल त्यांना नवी बिटकॉईन्स तयार करून दिली जातात)

अगदी थोडक्यात सांगायचं तर, दोन व्यक्तींमधला व्यवहार एका मध्यवर्ती संस्थेनं एकाच ठिकाणी नोंदवायच्या ऐवजी जगभर पसरलेल्या नेटवर्कनं अनेक ठिकाणी नोंदवून ठेवणं, त्या व्यवहारांच्या नोंदींमध्ये कोणालाही बदल करता येत नसल्यानं आणि कोणालाही कोणतीही नोंद तपासून बघणं शक्य असल्यानं साऱ्यांचा या नेटवर्कवर विश्वास बसतो. ह्या विश्वासार्हतेमुळे गूढचलनं व्यवहारांसाठी वापरली जातात.

Average: 8 (1 vote)