मधाची वाईन, अननसाची वाईन!

प्रसाद शिरगांवकर
वाईन

मी घरच्या घरी तयार केलेल्या दोन वेगवेळ्या वाईन्सची गोष्ट आहे!

आमच्या बिल्डिंगला दरवर्षी मधमाशा सात-आठ भली पोठी पोळी करतात आणि त्यात भरपूर मध जमा होतो. मी दहाव्या मजल्यावर रहातो, त्यामुळे एक मोठ्ठं पोळं माझ्या टेरेसच्या खालीही दरवर्षी होतं. यंदा एक कारागीर माणूस आला आणि त्यानी त्यातलं मध आम्हाला काढून दिलं... बिल्डींगमधल्या अनेक जणांनी पातेली पातेली भरून मध घेतलं... मी ही...

ते मध घरी घेऊन आल्यावर या एवढ्या मधाचं करायचं काय ते कळेना! महाबळेश्वरला वर्षातून एखाद्या होणाऱ्या ट्रिपमधे आणलेली पाव किलो मधाची बाटली आम्हाला दोनेक वर्षं पुरते! पण आता तर दोनेक किलो "घरचं" मध समोर होतं! मग जरा इंटरनेटवर सर्च मारला तर मधापासून वाईन करता येते असं समजलं, आणि करुन बघुया म्हणलं!

मधापासून वाईन (मद्य) तयार करणं हा माणसाचा जुना छंद आहे... जगभरातल्या बहुसंख्य संस्कृत्या आणि समाजांमध्ये याचा उल्लेख सापडतो... आपल्याकडेही हा प्रकार होत असावा (किंबहुना "मद्य" हा शब्दच "मध" किंवा "मधु" या शब्दापासून आला असावा असा माझा दाट संशय आहे!)... आपल्याकडच्या जुन्या ग्रंथांमध्ये याच्या रेसिपीचा उल्लेख असेलही, पण तो मला माहित नाही... मी आपली इंटरनेटवरून रेसिपी शोधली आणि प्रयोग करून बघितला!

मधापासून मद्याची निर्मितीकरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे! आपण दुधाला विरजण लावून त्याचं दही जसं बनवतो तितकी सोपी! दुधाला जसं दह्यां विरजण लावतो तसं इथे मधाला (त्यात एकास चार प्रमाणात पाणी मिसळून) यीस्टचं विरजण लावावं लागतं! आणि मग हे यीस्ट नावाची बुरशी या मिश्रणातल्या साखरेचं अल्कोहोलमध्ये रुपांतर करतात! बस्स! इतकं सोपं आहे!!

अर्थात दुधाचं दही व्हायला केवळ चार-सहा तास लागतात, मात्र मधातल्या साखरेचं अल्कोहोल करायाला या बुरशीला चार-सहा किंवा त्याहून जास्त दिवस लागतात... इतके दिवस हे मिश्रण सांभाळून ठेवावं लागतं. त्यात वाईट बॅक्टेरिया आणि इतर जिवाणू जाणार नाहीत या साठी जपावं लागतं वगैरे... पण हा सगळा प्रोसीजरचा भाग झाला... ती नीट सांभाळली की घरच्या घरी मधापासून मस्त वाईन तयार करता येऊ शकते!!

तर मी मधापासून वाईन तयार केली... आणि ती बाटलीत भरून ठेवली...

याच सुमारास माझ्या भावानी त्याच्या शेतातले ताजे अननस दिले. मग म्हणलं अननसाचीही वाईन करून बघुया... मूळ तत्व तेच! कोणत्याही प्रकारची नैसर्गिक साखर असलेल्या मिश्रणाला यीस्टचं विरजण लावून त्यातल्या साखरेचं अल्कोहोलमध्ये रुपांतर करून त्याची वाईन बनवायची!! मधापासून वाईनचा प्रयोग मी दोन लिटरच्या मिश्रणाचा केला होता... तो बरा झाला म्हणून डेअरींग करून अननसाचा प्रयोग मी चार लिटरच्या मिश्रणाचा केला... अन तो ही कडक झाला!!

या दोन्ही वाईन्स सध्या बऱ्या लागतायत... त्या चार-सहा महिने किंवा जास्तवेळ मुरवत (aging करत) ठेवल्या तर त्या सॉलीड लागतील असं वाटतंय... बघुया!!

गंमत म्हणजे, ५० रुपयांचा एक अननस, २० रुपयांची साखर आणि दहा रुपयांचे यीस्ट अशा नव्वद रुपये खर्चात ३ बाटल्या भरून वाईन तयार झाली!! म्हणजे ३० रुपयांना एक बाटली... बाजारात जरा बऱ्या वाईनची ५०० ते ७०० रुपयांना एक बाटली मिळते!!

पैशांचं सोडून द्या, पण मला घरच्या मधाची आणि घरच्या अननसाची घरी बनवलेली वाईन घरच्या घरी प्यायला मजा येतीये!!

 

Average: 9 (2 votes)