पेरूची दारू : "अमरुदा"!

प्रसाद शिरगांवकर
guava wine

साहित्य:

  • १ किलो ताजे पेरु
  • १ किलो साखर
  • ५ लिटर पाणी
  • दालचिनीचे तुकडे (optional)
  • वाईन यीस्ट
  • पेशन्स!

कृती:

पेरूच्या (सालासकट) मोठ्या फोडी करून घेतल्या. त्या पाण्यात टाकून, त्यात साखर टाकून एक उकळी आणली. हे मिश्रण (फोडींसह) मोठ्या फूड ग्रेड प्लॅ्टिकच्या डब्यात भरलं. थंड झाल्यावर त्यात पाव चमचा यीस्ट टाकलं. डबा झाकून बंद ठेवला (मात्र झाकण घट्ट न लावता थोडी फट ठेवली)

चार-पाच दिवस रोज हे मिश्रण दिवसातून एकदा ढवळलं. हे प्रायमरी फर्मेंटेशन.

मग स्वच्छ पंचामधून हे मिश्रण गाळून घेतलं. फोडी आणि सर्व घन माल टाकून दिला. गाळलेलं फर्मेंटेड मिश्रण बाटल्यांमध्ये भरलं. प्रत्येक बाटलीत एक दोन दालचिनीची तुकडे टाकले. झाकणं सैलसर लावून या बाटल्या सेकंडरी फर्मेंटेशनला ठेवून दिल्या. (दालचिनी टाकण्यामागचा हेतू तिचा फ्लेवर येणं आणि यीस्टला सेकंडर फर्मेंटेशनसाठी खाद्य मिळणं असा दुहेरी होता)

मग चार आठवडे शांतपणे वाट बघितली. बाटल्यांमध्ये फर्मेंटेशन सुरु असल्याचं दिसत होतं (बुडबुडे येताना दिसत होते). फर्मेंटेशनचा वेग कमी झाल्यावर पुन्हा एकदा सर्व मिश्रण वास्त्रगाळ करून घेतलं आणि बाटल्यांमध्ये भरलं.

आता अत्यंत हलकी हिरवी छटा असलेलं आणि सौम्य अल्कोहोल असलेलं (5.6% abv) असं पेय बनलं आहे! हलकासा कच्च्या पेरूचा + अल्कोहोलचा वास आहे. थंड करून चव घेतली तर पेरूचा हलकासा स्वाद असलेलं गोडसर आणि रिफ्रेशिंग पेय तयार झालंय!! अल्कोहोलचं प्रमाण साडेपाच टक्के म्हणजे माईल्ड बियर किंवा ऍपल सायडर इतकं.... एखाद-दोन ग्लास घेऊन हलकी तरल नशा येईल इतकंच!

गंमत म्हणजे ह्याला एक पुसटशी after-test आहे. एक ग्लास पिऊन झाल्यावर बराच वेळ जिभेवर पेरूची हलकिशी चव रेंगाळत रहाते!!


मी तयार केलेल्या 'आपल्या' फळांच्या वाईन्सना मी आपली नावं देतो! पेरूला काव्यात्म असं मराठी नाव सुचेना, 'पेरूची दारू' फारच रावडी वाटलं. हिंदीत पेरूला 'अमरुद' म्हणतात म्हणून त्याच्या जवळ जाणारं 'अमरुदा' हे नाव ठेवलंय! कसं वाटतंय?

(Amrut नावाची एक Indian Single Malt आहे हे माहित आहे. पण मी बनवलेली ही 'अमरुदा' आहे!!)


थोडक्यात: मध, अननस, सफरचंद, कैरी, हापुस, कोकम आणि जांभळानंतर शिरगावकरांनी पेरूलाही आज बाटलीत उतरवलं!

डिस्क्लेमर:

  1. घरी मद्य तयार करणं ही अत्यंत सोपी जैव-रासायनिक प्रक्रिया असली तरी कोणत्याही जैव-रासायनिक प्रक्रियेत काहीतरी चुकण्याचा आणि पदार्थ बिघडण्याचा धोका असतोच. त्यामुळे अशा प्रक्रिया पूर्ण अभ्यास करून आणि स्वतःच्या रिस्कवरच कराव्यात.
  2. अमर्याद मद्य पिणं हे आरोग्यास धोकादायक असतं आणि ते स्वतःच्या शरीराची आणि सामाजिक आयुष्याची राखरांगोळी करू शकतं.
  3. हलकी नशा हलक्या प्रमाणात उपभोगू शकत असाल अन ती एंजॉय करून सोडून देऊ शकत असाल तर या वाटेला जा.
Average: 9 (2 votes)