जादूचा फुगा

प्रसाद शिरगांवकर

माझ्यापाशी एक जादूचा फुगा आहे
फुगवायला सोपा, फोडायला अवघड
कधी आला माझ्यापाशी?.... आठवत नाही
पण आठवतं तेंव्हापासून आहेच माझ्या सोबत

कदाचित मी पहिलं पाऊल टाकलं तेंव्हा आला असावा
कदाचित पहिले बोबडे बोल बोललो तेंव्हा
मग फुगतच राहिला हळूहळू
मी आयुष्यात टाकलेल्या प्रत्येक पावलागणिक

कधी फुगवत गेलो मी
प्राणपणानी त्यात फुंकर मारून
कधी फुगवत गेले इतर लोक
त्याला फक्त आंजारून गोंजारून

कधी प्राण कंठाशी आले, श्वास कोंडले गेले
की बरा पडतो हा फुगा
थोडासा उघडायचा आणि त्यातून प्राणवायू घ्यायाचा
आणि नव्या दमानं जगायला लागायचं!
गंमत म्हणजे, ह्यातून हवा काढून श्वास घेतला
की अजूनच मोठा होतो हा फुगा!

कधीकधी मात्र इतका मोठा होतो हा फुगा
की डोळ्यासमोर फक्त तोच दिसत रहातो
आणि सगळं जग दिसत रहातं फक्त या फुग्यामधून
धुसर, अस्पष्ट... तरीही, फुग्याला हवं तसंच
आणि गंमत म्हणजे,
या फुग्याच्या चष्म्यातूनच जगाकडे बघणं
वावगंच वाटत नाही मला!

कधीकधी त्रास होतो, ओझं होतं फुग्याचं

सारखा बाळगत बसायचा
सारखा फुगवत बसायचा
सारखा सांभाळत बसायचा
काय झंझट आहे साला...

पण तरीही तो फुगा
फोडावासा वाटत नाही
सोडावासा वाटत नाही
कारण तो फुगा म्हणजेच 'मी'
असं खोलवर रुजवतो
तो फुगाच माझ्या मनात
म्हणून फुग्यापासून सुटका करणं
काही केल्या जमत नसतं!

मग तो फुगा सोबत घेऊनच जगत रहातो
फुग्यात हवा भरत रहातो
फुग्यामधून जगाकडे बघत रहातो
फुग्याला सतत सांभाळत रहातो
आणि फुगा फोडणाऱ्यांना टाळत रहातो
आणि स्वतःसाठी न जगता
फक्त फुग्यासाठीच जगत रहातो!

काही जण या फुग्याला 'अहंकार' म्हणतात म्हणे
पण माझा मात्र हा अहंकार नाही
हा तर छोटासा जादूचा फुगा आहे...
फुगवायला सोपा, फोडायला अवघड!!

No votes yet