फुलतो अजून मी

प्रसाद शिरगांवकर

पाहून माणसांना बुजतो अजून मी
गर्दीत एकट्याने जगतो अजून मी

सौद्यात जीवनाच्या हरलो कितीकदा
बाजार मांडताना दिसतो अजून मी

सत्यात झोपडेही माझे नसे तरी
स्वप्नातले मनोरे रचतो अजून मी

श्वासांत तेवणारी न्यारी निरांजने
संपून तूप गेले, जळतो अजून मी

नाहीच दुःखितांची पर्वा कुणासही
अश्राप आसवांना पुसतो अजून मी

दुष्काळ सोसले मी येथे जरी किती
रुजतो अजून मी अन फुलतो अजून मी

Average: 7.6 (17 votes)