छंदबद्ध कविता

छंदबद्ध कविता

रे गजानना

प्रार्थनेस आमच्या पाव रे गजानना
लेकरांस भेटण्या धाव रे गजानना

या विराट सागरी नाव आमची असे
दाटले तुफान अन सोबती कुणी नसे
सावरावयास ये नाव रे गजानना
लेकरांस भेटण्या धाव रे गजानना

तेवतो तुझाच हा ज्ञानदीप अंतरी
तूच पंचप्राण अन तूच सत्य वैखरी
स्पंदनांतही तुझाच भाव रे गजानना
लेकरांस भेटण्या धाव रे गजानना

जाणतो अम्ही कुठे मूर्तता अमूर्तता
भेटशील तू जिथे तीच फक्त पूर्तता
शोधतो तुझाच मी गाव रे गजानना
लेकरांस भेटण्या धाव रे गजानना

प्रार्थनेस आमच्या पाव रे गजानना
लेकरांस भेटण्या धाव रे गजानना

Average: 7 (7 votes)

नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?

नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन

Average: 8.6 (68 votes)