पाऊस जोराचा... आकांताचा...

प्रसाद शिरगांवकर

वेळ रात्रीची... एकांताची
पाऊस जोराचा... आकांताचा...

खिडकीच्या काचेवर त्वेषानं आपटणारे थेंब
घरात जरी येत नसले
तरी हृदयात खोलवर शिरत रहातात
आणि
घराबाहेरचे वादळवारे आता
मनातही वेगानं फिरत रहातात

आठवतोय
आपल्या छोट्याशा खोलीतला
तुझा कालपरवाचाच सहवास...
आठवतायत
गालांवर अजून रेंगाळणारे
तुझे हळुवार, उबदार श्वास...
अन आठवतोय
या वादळावर असलेला
तुझा निस्सीम अनाहत विश्वास...

वारं पुन्हा घोंघावायला लागतं...
मी उठतो, खिडकी घट्ट बंद करतो
पडदे पूर्ण ओढून घेतो
अन पांघरुणात शिरून झोपायचा प्रयत्न करतो
थेंबांचा काचेवरचा आवाज
आता येईनासा होतो...

मी सुस्कारा सोडून डोळे मिटतो
हळूच डाव्या कुशीवर वळतो
सवयीनं माझा हात
शेजारच्या जागेवर जातो...
अन इतका वेळ तटवून ठेवलेला पाऊस
अलगद पापण्यांतून वहायला लागतो....

वेळ असते रात्रीची... एकांताची
अन पाऊस असतो विरहाचा... आकांताचा...

Average: 8.7 (39 votes)