गूढचलनाचा इतिहास आणि सद्यस्थिती

प्रसाद शिरगांवकर

गूढचलनं अस्तित्वात कशी आली आणि झपाट्यानं जगभर पसरली कशी याचा इतिहास फारच रोचक आहे. १९९८ साली निक झाबो नावाच्या एका संगणक शास्त्रज्ञानं ‘विकेंद्रित डिजिटल चलनाची’ संकल्पना मांडली. त्यानं ‘बिट गोल्ड’ नावाच्या एक प्रणालीची संकल्पना मांडली. क्लिष्ट गणिती कोडी सोडवण्याच्या बदल्यात लोकांना व्हर्चुअल पैसे देणं आणि मग ते पैसे वापरून झालेले व्यवहार नोंदवून चलनव्यवस्था उभी करणं अशी त्याची कल्पना होती. ती तेंव्हा ह्या मॉडेलमधल्या काही अडचणींमुळे प्रत्यक्षात आली नाही.

त्यानंतर दहा वर्षांनी सातोशी नाकामोटो नावाच्या एका गूढ व्यक्तिमत्वानी बिट गोल्डच्या मूळ प्रस्तावात सुधारणा करून ‘बिटकॉईन’ची व्यवस्था तयार केली. त्यानं नुसता प्रस्ताव न मांडता ही सर्व चलनव्यवस्था चालवणारं सॉफ्टवेअरही तयार केलं आणि त्यावर आपली मालकी वगैरे न ठेवता ते मुक्तस्रोत (Opensource) म्हणून प्रकाशितही केलं. त्याचा प्रस्ताव Cryptography मध्ये काम करणाऱ्या अनेकांना खूप आवडला. शिवाय सॉफ्टवेअर मुक्त असल्याने अनेकांनी ते वापरायला आणि वापरून बिटकॉईन्स तयार करायला सुरुवात केली.

दोन-तीन वर्षांतच बिटकॉईनचं सॉफ्टवेअर वापरणारी एक कम्युनिटी जगभर तयार झाली. मग त्याचा निर्माता असलेल्या सातोशी नाकामोटोने त्याच्या वेबसाईटपासून ते सॉफ्टवेअर पर्यंत सर्व गोष्टींचे हक्क सोडून दिले आणि कमयुनिटीला म्हणजे जगाला देऊन टाकले. नावावरून जपानी वाटणारी ही व्यक्ती काळी का गोरी हे कोणालाही माहित नाही. हे त्याचं खरं नाव आहे का हेही कोणाला माहित नाही. ती एकच व्यक्ती होती का निनावी ग्रुप होता याचा कोणाला अंदाज नाही. कुठल्याशा अज्ञात व्यक्ती किंवा गटानं जगाला कलाटणी देणारी काहीतरी प्रणाली तयार केली आणि ती जगाला अर्पण करून ती पुन्हा अज्ञाताच्या पडद्याआड नाहीशी झाली ही एक विलक्षण थक्क करणारी गोष्ट आहे!

बिटकॉईनचा प्रस्ताव आणि सॉफ्टवेअर दोन्ही मुक्त असल्याने ते कॉपी करून त्याच्यासारखी इतर चलनं किंवा चलनव्यवस्था बनवणं सहज शक्य होतं. जे झालंही. बिटकॉईनची कल्पना आणि सॉफ्टवेअर कोड वापरून त्यासारखी अनेक चलनं जगात आली आणि अजूनही येत आहेत. बिटकॉईन व्यतिरिक्त, आजमितीला, एथिरियल, बिटकॉईन कॅश, रिपल, लाइटकॉईन, पियरकॉइन ही आणि अशी तब्बल तेराशे गूढचलनं जगात आली आहेत.

आणि जेमतेम आठ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या ह्या सर्व गूढचलनांचं आजचं बाजारमूल्य साडेसारशे अब्ज डॉलर्स इतकं आहे!

अर्थात आद्य गूढचलन बिटकॉईन हेच सगळ्यांत जास्त लोकप्रिय आणि बाजारमूल्यातही आघाडीवर आहे (साडेचारशेतलं साडेतीनशे अब्ज डॉलर्स) हे बिटकॉईन्सचं मूल्य आहे.

Average: 8 (1 vote)